Wednesday, December 3, 2008

खेळ

परमेश्वराची दोन लहान लेकरे
जशी गोजिरवाणी कोकरे
तशी पृथ्वी आणि आकाश
ब्रम्हांडाच्या प्रांगणात खेळत होती सावकाश
(कविता ऐका)

खेळता खेळता आकाशाने सहज
आपल्या जवळचा सूर्याचा पिवळा सागरगोटा
घासून घासून तापविला लाल आणि.........
त्याचा पृथ्वीला हळूच चटका दिला.....
रडत भेकत, कोकलत, किंचाळत..
पृथ्वी गेली परमेश्वर होता जेथ
आणि सांगितले त्याला आकाशाचे गा-हाणें
आकाशाला बोलाविले देवाने..........
दानवा, आपल्या बहिणिला धाकुल्या
कशास छळतोस कां दाखवितोस वाकुल्या
जा आत्ताच्या आत्ता तोंड काळं कर
प्लुथ्वी बाई, तुमि या बेटा माझ्या बलोबल

भोळे भाबडे आकाश.......
मावळला त्याच्या चेहे-या वरचा प्रकाश
काळ्या काळ्या ढगांचा कोळसा माखून
त्यानं खरंच कि घेतलं आपलं तोंड काळं करून
आणि गेला परमेश्वर होता जेथे,
बघाना माझे तोंड काळे झाले कि नाही ते...
परमेश्वर त्याच्या भाबडेपणा वर हसला
आपली थट्टा केली असं वाटलं आकाशाला
घळघळा रडू लागला बिचारा
पृथ्वी ओणवी होऊन झेली त्याच्या अश्रू धारा
परमेश्वर बघे त्यांचा बालिश खेळ सारा
अन् विसरून जाई सा-या विश्वाचा पसारा

शरद काळे
ग्वाल्हेर १९५७