Tuesday, December 15, 2009

थंडी

दाट धुक्याची कुल्फी मलई
पृथ्वीच्या पेल्यात ओतुनी
चघळित बसले विक्षिप्तच नभ
चंद्र किरण चमच्याने ढवळुनि ।
बळे बळे पोत्यांत कोंबला
रात्रीचा जो घन कोलाहल
गस्त शिट्या अन् गजर घड्याळी
त्यांत आणती क्षणिक चल बिचल ।
सायकलींचे धूड धडधडे
थडथडतात दुधाच्या टंक्या
त्या वर तोल सावरित भैये
घेती गर्म विडीचा झुरका ।
दुलईतील चाळवा चाळव
उठा उठा च्या अस्फुट हाका
शिळ्या कढी ला ऊत येउनी
सैल मिठ्या दृढ करती काखा ।
ताठ पुलाच्या वक्र कमानी
लक्तरेंच खाली अवघडली
नर देही कां आंत हुडहुडी
वा थंडीच निवा-या पडली ।
आंत उबेने छान लाडवुन
उष्ण उष्ण फुरफुरती किटल्या
आणि उबेस्तव अशाच केवळ
बशा कपांवर व्यर्थ टेकल्या ।
उजाडले जाणवून भास्कर
धैर्य जरा उठण्याचे करितो
थंडी चे परि बघुनि तांडव
पुन्हा अभ्रि गुरफटून घेतो ।
खुद्द चहाला असह्य थंडी
थंड कपाची सोडुन सोबत
लोळत लोळत उदरी अलगद
ऊन ऊन ते करितो खलबत ।
कृत्रिम गर्भपात अंड्यांचा
कुणी करी सर्रास तव्या वर
बाटलीतली सलज्ज मदिरा
नयनी होतसे आज अनावर ।
अस्सल दडवुनि ओव्हर कोटी
दुबळे दिसती प्रसन्न दणगट
चेस्टर वेढुनि उदास प्रमदा
कुणिही न दाखवू शके अंगलट ।
गजबजे न गजबजे तोच दिन
कसा संपला कुणा न कळले
आणि पुन्हा त्या हिम गौरीचे
आसमंती साम्राज्य पसरले ।

Saturday, November 14, 2009

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया
लपता कुठे समोर या
यंदा आपण लेट कसे
पायावर बैन्डेज दिसे ।

आला कां चालत पायी
मूषक वाहन कां नाही
चूक मानवा तुझीच रे
वदे गजानन खिन्न स्वरे ।

वाहन उंदिर मज नडला
कसा आज सांगतो तुला
मोदक भोजन सुग्रास
गुंगी आणी हमखास ।

म्हणून मी लोळता जरा
सुरू जाहला ससेमिरा
कुठे शेपटी कानांत
हळूच फिरवी तो दुष्ट ।

शरीरांत रोवली नखें
अजून ही जागा ठणके
अतोनात ऐसे छळुनी
मला म्हणाला तो शकुनी ।

दुखहर्ता पृथ्वी वरती
येई गदा उंदरां वरती
जो उठतो उंदिर धरितो
प्रयोगांत त्यां बळि देतो ।

मूषक मेध प्रभो यज्ञ
कसे मांडती शास्त्रज्ञ
तुझीच त्यांना रे फूस
नृशंस घालती धुडगूस ।

सुपा एव्हढे कान तुझे
मूषक शोक न त्यांत रुजे
असे मांडुनी गा-हाणे
चालुनि आला त्वेषाने।

मीच धरे वर जाणार
उंदरांस उद्धरणार
आशिर्वाद असू द्यावा
कसा बरे मी मागावा ।

मी ही मग अनुकंपेने
थोपटले त्या हाताने
पृथ्वी वर जाउलि पहिला
थोर हुतात्मा तो झाला ।

त्वरित पसरला प्लेग जगी
पडती मानव मृत्यु मुखी
तेंव्हां पासुन मी पाई
मूषक वाहन मज नाही ।

कोणी हे देखिल म्हणती
थोपटण्याची सान कृति
सहज तिच्यातुन जन्मियल्या
प्लेगाच्या पिसवा पहिल्या ।

झाला वक्रतुंड मौन
मी ही लज्जेने लीन ।

Monday, November 2, 2009

व्याख्यान

एक व्याख्याता बडा आला पहा हो बोलण्या
या तुम्ही या सादरे व्याख्यान त्याचे ऐकण्या ।
ऐकुनी जाहीर सूची-पत्र ऐसे लोक ते
सर्व गेले भाषणा कोणी न मागे राहते ।
काय ही चिक्कार गर्दी ऐकणा-यांची उडे
चेंगरोनी जाय कोणी अन् व्यथेने तडफडे ।
पांच मिनिटे लोटता वक्ता उमेदी ने उभा
ऐकण्या अन् लक्ष देण्या स्तब्ध झाली ती सभा ।
लोक हो.............खुंटे पुढे ते हाय कैसे बोलणे
अंग लागे थरथरू होई सुरू धुंडाळणे ।
काय कांही पाहिजे का, काय काही हरपले,
चौकशी चाले पहाता, लोक ही कंटाळले ।
मित्र वक्त्याचा पहा तो जाहला वेगे पुढे
स्फूर्ती नाही रे कुठे वक्ता असा कां बडबडे ।
थांबला नाही मुळी तो मित्र वेगे धांवला
आणि सेकंदात एका रंग-गेही पोचला ।
स्फूर्तिके तू काय येथे बैसली गे रंगूनि
धाव संगे आज माझ्या रंग जाई भंगुनी ।
लोचनी माधुर्य आले ओठ होती वेगळे
सांगण्या आधी कळोनी मूठ दाबी तो बळे ।
लोक हो हल्ला नको आम्हा हवी हो शांतता
शांतता राखाल तेंव्हा भाषणा ची हो कथा ।
सांगती ऐसे दटावूनि जनां ते लोक हो
काय भ्रष्टाचार चाले हा नुरे भू-लोक हो ।
स्फूर्तिका वक्त्या पुढे येऊन जेंव्हां बैसली
आणि जेंव्हां लावली तोंडी तयाने बाटली ।
कौतुके फेकी कटाक्षा,हासुनी वारांगना
स्फूर्ती येवोनी अहा सुरवात होई भाषणा ।
गाजले व्याख्यान त्याचे केव्हढे हो त्या दिनी
वृत्त-पत्री नाव ही आले तयाचे छापुनी ।

शरद काळे
ग्वाल्हेर 1956

Friday, August 28, 2009

राखी पौर्णिमा

आज राखी पौर्णिमा असे धामी
मोदभावे साजरी करू नामी
कां न दादा तू तरी अता यावे
ताई पूसे बंधुला विध्द भावे ।

लोप पावे अक्षुण्ण कळा आली
भाउराया च्या वदनी कऴा ल्याली
असा त्याला पाहुनी मनी खिन्न
भगिनि प्रेमळ ती होय ह्रद-विदीर्ण ।

काय भाऊ चिंतितो मना माजी
सांग कां ही दु:छटा तनू माजी
काय कांही हातून गुन्हा झाला
बोल ना रे कां धरी हा अबोला ।

बंधु कंठी होऊन रुध्द अंती
बंध मोडोनी रवे भाव येती
भाउ म्हणणे तू सोड मला ताई
तुला देण्यास्तव जवळि नसे काही ।

हाय मोठा जाहलो उगिच घोडा
पै कमविणे येइना कसा वेडा
बंधू तू गे कां तरी मला मानी
हेंच कोडे म्या पडे मनी ध्यानी ।

ह्या जगी गे सत्कार संपदेचा
आणि गरिबां दुत्कार कटू वाचा
सोय दीनांची कुणी ही करीना
आणि पीडेची तमा बाळगीना ।

सोड ताई तू तरी प्रेम भाव
तोड नाते हे, राख दुजा भाव
बोल ऐसे बोलून निघे वेगे
त्यास ताई थांबवावया लागे ।

भाउराया तू कसा वागतो रे
आजलागी तू मला नोळखी रे
जागजागी वंदिती लोक पैसा
त्यास गमवाया ठाकिती उसासा ।

असे त्यांहुन मी परी वेगळी रे
प्यावयाला इच्छिते प्रेम वारे
भाऊ मजला तू असे एकमेव
द्रौपदीचा रे जसा कृष्णदेव ।

अणि म्हणुनी विनविते भाउराया
घाल प्रेमाचे वस्त्र झांक काया
संपदा रे म्यां मनी मातिमोल
बोल प्रेमाचे चार रे अमोल ।

येई म्हणुनी तू झणि मम गृहाला
राखि बांधू दे तुझ्या ह्या कराला
प्रेमशब्दें होऊन प्रभावीत
बंधु गेला होतीच बहिण जेथ ।

आणि प्रेमें बांधिली तिने राखी
काव्य अपुले तो करी तिच्या राखी
भेट त्याची ती बघुनिया अमोल
खालि ओघळले अश्रु ते विलोल ।

शरद काळे
ग्वाल्हेर, 1956

चांगलाच उशीर झाला पोस्ट करायला

Saturday, June 6, 2009

सोपे नाटक

नाटक कोणी लिहू नये
ते करणे कोणा नच ये
खटाटोप फारच असतो
अपयश सर्प तरी डसतो ।
लाबलचक शेतावाणी
घोकावी भाषणें कुणी
प्रॉम्टिंग जर का जोराने
केले तर हॉल दणाणे ।
प्रॉम्टिंगजर का केले हळू
पात्रे लागती बावचळू ।
तरिही मी नाटक लिहिले
अन् लोकांना आवडले ।
वाचनालयीं ते घडले
नट होते वाचत बसले
वाचत असतांनाच नट
करीत होते संवाद ।
लांबलचक क्लिष्ट भाषणे
म्हणती नट कौशल्याने
प्रॉम्टिंग तर मुळी नव्हते
लोक थक्क झाले होते ।
पण अंदर की बात अशी
तुम्हां सांगतो घडली जशी
एकुण एक ऩटा हाती
नाटकाची मम प्रत होती ।

पण प्रत्येक प्रती वरचे
कव्हर निरनिराळे होते ।

शरद काळे
ग्वाल्हेर, 1959

Monday, March 16, 2009

पाणी

ह्या कवितेस पाणी ह्या विषयावर आयोजित केलेल्या काव्य स्पर्धेत 1952 साली प्रथम पारितोषिक मिळाले होते. कल्पना अशी आहे कि कवि पाण्यात पडलाय अन त्याला पोहता येत नाही तर शेवटचा प्रयत्न म्हणून तो पाण्याचीच स्तुति करतो अन् प्राण वाचविण्यांत यशस्वी होतो .

बुड बुड शिरते मौजेने, जल नाकां अन् तोंडात
जणु भू वरि येउनि देवी जल भरते नर भांड्यात
वाचवा मला हो कविच्या त्या हाका जन तांड्यात
मावळती, कोणि न पुढती परि येती त्या षंढांत
कवि बोंबा मारुनि थकला
धैर्यास आपुल्या मुकला
डोही अन् कुंथुन थुकला
शेवटची आशा म्हणुनी पाण्यास लावि कवि लोणी ।

अपमान तुझा बा पाण्या अत्यंत आजवर झाला
गुण वर्णन तुझे कराया कवि एक पुढे नच आला
दुर्लक्ष तुझे जे झाले तू राग मनी ठेवियला
अति वर्षण महा पुराने कधि मधि व्यक्त ही केला
लिहिण्यास जला तव करणी
उचलली जरी ही झरणी
तू येतो अमुच्या नयनी
अमुच्यात तूच नसल्याने ओळ ही येइना ध्यानी ।

गर्दभास तू जर नसता एकनाथ देते काय
मारून बाण त्वेषाने काढते राम तरि काय
लक्षुमिने धनिकां सदनी मग भरले असते काय
रण य़ोध्दा तरवारीने शत्रूस पाजिता काय
अन् प्रणयी नव युग्माला
करता ही नसत्या आल्या
उन्मादाने जल लीला
मग कसे सकाळी असते ढोसले चहाचे पाणी ।

दुग्धांत नित्य गवळ्याने मग काय मिसळले असते
सोनार दागिन्यां वरती सोन्याचे काय चढवते
चांगल्या गोल मोत्याला मग काय पारखी म्हणते
जीवन अफाट हे सारे बुडबुडा कशाचा ठरते
कोलंबस नसता थोर,
तेनसिंग एक मजूर,
गाजता न जगि ह्या फार
अन् कसे मुखाला सुटते पक्वान्न पाहुनी पाणी ।

पाणपोई यशवंतांची मग कशी गाजली असती
तोंडाचे ते पळण्याची वेळ ही ठेपली नसती
ह्रदयाची अति दुःखाने स्थिति काय जाहली असती
साहित्यिक झाले नसते राहता कोरड्या दौती
कवि विनवि असा पाण्याला
तो जवळ ओंडका आला
जणु हात जलाने दिधला
झणि कविच्या नयनी दाटे ते कृतज्ञते चे पाणी ।

शरद काळे
ग्वाल्हेर

Saturday, March 7, 2009

पोत्याची कैफियत

कां जन्म दिला तू उगाच मजला देवा
नेहमी करू का इतरांचा मी हेवा
मी कोण कुणाचा कसे तुला सांगू ते
पोते-या सम जगणारे मी रे पोते ।

मम जातीतिल इतरांची सुंदर नावे
कुणी पिशव्या कुणी झोकात बैग म्हणवावे
त्या ट्रंका बघ त्या सूटकेस ही नामी
मग मलांच कां पोते रे म्हणती ज्ञानी ।

पिशव्यांस उचलण्या असती सुंदर बंद
त्या ट्रंका ही कडिदार हासती मंद
ऱमणींच्या हाती पर्स ही सुंदर डुलते
मग मलाच कां जग कान धरुन खेचडते ।

मज काय चारितिल लोक नसेच भरवसा
सीमेंट धान्य मज जसे तसाच कोळसा
सोसतो सर्व हे मुकाट म्हणुनिच हाय
भरल्या पोटावर दुनिया देते पाय ।

लोकांचे ओले पाय ही वर्षा काली
कोरडे करावे स्वतास पसरुनि खाली
बायका घासती अरवी पाठी वरती
खाजविण्या मज ना हात कशी ही नियती ।

निशब्द अशी मी सतत चाकरी करतो
तरि तोंड मनुज कां उगाच माझे शिवतो
कुणि भरतो बेढब पिंपे भांडि उदरी
मुडदे ही दडविण्या ची करि कुणी बळ-जबरी ।

कधी उद्वेगाने मी पण उगवी सूड
पाठी वर बसता कोसळते नर धूड
ह्या जगात माझे मित्र खरे उंदीर
जे शस्त्र क्रियेने हलके करिती ऊर ।

उगवेल कधी तो दिवस सुखाचा शहरी
पोत्याच्या साड्या सूट झळकतिल शरिरी
वा विराट रूप धरावे वाटे मजला
ह्या जगास कवळुन जावे सिंधु तळाला ।

शरद काळे
ग्वाल्हेर 1956

Friday, February 13, 2009

वेडा पिंजारी

सृष्टीचा वेडा पिंजारी
वा-याची करि धरुनि धनुकली
पिंजत बसला सफेत कापुस
भरावयाला दुलई अपुली ।
त्या दुलई चे अस्तर शामल
गर्भ रेशमी निळे झुळझुळे
भरा व्यवस्थित किति जरी कापुस
लोळा गोळा होने न टळे ।
म्हणून हा वेडा पिंजारी
पुन्हा नभाची दुलई उकली
शुभ्र ढगांचा नाजुक कापुस
पिंजे त्याची पवन धनुकली ।
सकाळ पासुन वेड्यागत हा
श्रमून भरतो अपुली दुलई
दिवसा सगळी नीट भरुन
तिज पांघरावया रात्री घेई ।
दुलई चे बाह्यरूप शामल
आणि मधोमध चंद्र चांदवा
ता-यांच्या टिकल्या चमचमती
रात्री सारे दिसे वाहवा
रात्र भरातच परंतु होतो
सगळा कापुस लोळागोळा
फिरून तो पिंजारी पसरे
मळका कापुस अस्तरी निळ्या ।
नित्य तयाचा अजब छोकरा
रविची भिंगरी फिरवित येई
फिरत फिरत ती खुशाल सारी
पांढरी रुई उधळित जाई ।
मळके छोटे पुल करिते
ढवळा कापुस कधि कधि काळा
मार खाउनी पिंजर बालक
अश्रूंनी मग भिजवी त्याला ।
शरद काळे
ग्वाल्हेर
1959

Saturday, January 31, 2009

खोटा रुपया

कविता ऐका


प्रलय काळ येण्याच्या आधी
सुर लोकी च्या मुद्रा कोषी
सर्व सुरांनी बदलुन घ्याव्या
चांदी च्या रुपयांच्या राशी ।
कारण प्रलया नंतर येथे
चालू होतिल नवीन नाणी
चालणार नच मग हे रुपये
कुरकुर किति जरी केली कोणी ।
देवेशा च्या आदेशाचे
पालन करण्या देव धावती
नाण्यांनी भरलेले गाडे
घेउनि मुद्रा कोशी जाती ।
एक एक रुपया वाजवुनि
नीट बघुनि मग मोजक घेई
त्याच किंमती ची त्या बद्दल
नव नाणी त्या सुरास देई ।
एक निघाला रुपया खोटा
असेच रुपये बघता बघता
काळे काळे डाग तया वर
नीट नाद ही उमचत नव्हता ।
बदलणार हा मुळीच नाही
रुपया फेकुन मोजक वोले
ज्याचा होता तो सुर, चेहेरा
वाईट करुनि त्याला झेले ।
गाडाभर बाकीचे रुपये
बदली मोजक त्याच सुराचे
त्याला पण तो खोटा रुपया
करांत अपुल्या अतिशय जाचे ।
मानहानि झालेली गिळुनी
खिन्न देव तो सदनी आला
अर्धांगीला नकळत रुपया
क्षीर सागरी हळुच दडवला ।
अतिशय लोभी स्वभाव त्याचा
बसू न देई स्वस्थ तयाला
काळोखाच्या राखुडीने
बघू घासुनी, विचार केला ।
अखेर एका सायंकाळी
अलगद काढी रुपया आंतुन
आर्धांगीची नजर चुकवुनी
खोटा रुपया क्षीर-धनांतुन ।
लावु लागला एका बाजुस
हळु हळु ब्रासो काळोखाचा
अर्ध-शाम अष्टमीस होउनि
तम-मय झाला तो अवसेचा ।
हळू हळू मग काढुनि ब्रासो
बघू लागला सुर आशेने
अर्ध-शाम अष्टमीस दिसला
पौर्णिमेस चमके तेजाने ।
हाय परंतू तसेच होते
त्यावर काळे काळे ठिपके
आणि निराशेने सुर त्याला
पुन्हा क्षीर सागरात फेके ।
असेच वेडे प्रयोग होतिल
प्रलय काळ पर्यंत सुराचे
तोवरि तरि दिसणे नच दिसणे
चालत राहिल ह्या चंद्राचे ।
आपण ज्यांना तारे म्हणतो
ते तर रुपये खरे चमकती
नीट पारखुन मोजक ज्यांना
ठेवी इतक्या उंची वरती ।