Monday, November 3, 2008

इंद्रधनुष्य

म्हणती ज्याला इंद्र धनु

सप्तरंगी स्वर्गीय तनु
धनुष्य नच ते इंद्राचे
आहे परि रविरायाचे
कन्या त्याची
भू नावाची
अति लाडाची
खोड्या करते नित्य किती
मुळिच नसे त्याला गणती ।

गोरगोरा सोनुकला
भाऊ धाकुला चंद्र तिला
उगिच तया रॉकेट नखी
ओरबाडिते सुखा सुखी
स्पुतनिक लाडू
कधी नच कडू
आपण वाढू
बाळाच्या पाठी वरती
बोलुनि करते तसेंच ती

चंद्र बिचारा कळवळला
सूर्य तिला रागे भरला
अल्लड धरणी रुसरुसली
कोमल कलिका जणु सुकली
आदित्यांनी
मग मन धरणी
पाहिली करुनी
भू राणी परि नच हसली
अधिकच रुसली अन् फुगली ।

बसली असता अशी रुसुनी
स्पर्श कोवळा होय तनी
आश्चर्याने वर बघता
रागिणि झाली झणी स्मिता
तन गंगेचे
बहु रंगाचे
वक्रांगाचे
धनुष्य धरणीला दिसले
पित्याच्या करी धरलेले ।

सलिल सरींचे शर सुटती
ठेवताच त्या धनु वरती
भू राणी च्या रोखाने
वितळती तनुच्या स्पर्शाने
दोर नच दिसे
कसे घडतसे
बाण सुटतसे
अधीर होउनि भूमि पुसे
बाबा दोरि कशी न दिसे ।

किरण करांनी बाबांनी
ताणुनि धरली दोरि झणी
चपला दोरि लखलखली
टणत्कार करती झाली
क्षणांत दिसली
पुनहा लोपली
पृथ्वी भिजली
बाणांच्या वर्षावाने
अंग फुले रोमांचाने ।

मधुर चालला खेळ असा
भानु प्रफुल्लित करी रसा
शाम ढगांचे ते भाते
झाले अगदी पुरे रिते
इंद्रधनू ते
कशास उलटे
जगास दिसते
कारण ते प्रतिबिंब असे
घन-आरशी पांढ-या दिसे

शरद काळे
ग्वाल्हेर
१९५८