Monday, September 29, 2008

पतंग

हा पतंग रंगित पहा निळा
बागडे कसा अंबरी खुळा

वायु संगे वर वर चढतो
हिसका देता खाली येतो
सैल सोडिता मज धाववितो
लावितो मला फार हा लळा ।


उडतांना हा उंच खरोखर
गमतो मजला शतपट सुंदर
ईर्षेने खग उडती वरवर
पण थांब पतंगा सरे रिळा ।

पतंग अन् मी गच्ची वरती
घेउनि चकरी आणिक लई ती
उडवी मांजा लावुनि पुढती
लढवि ना कुणी पेच आगळा ।(कविता ऐका)

हवे पतंगा सम ते जीणे
क्षण दो क्षण बालका रमविणे
आणि स्वत: ही नभी बागडणे
वाहते सौख्य यांत खळखळा ।

शरद काळे
ग्वाल्हेर
१९५५

Thursday, September 25, 2008

आवडते आवाज



कधी नदीच्या लाटांचा खळखळाट जो पडतो कानी,
दु:ख विरुनिया जाई सारे मोद प्राप्ती हो ऐकोनी ।

लय गंभीर सागराचा हा कधी मनाला वेधितसे,
भरती आणि ओहोटी समयी फार मनोरम वाटतसे ।

प्रभात काळी कप-बशी अपुला गोड ध्वनी तो ऐकवुनी,
जणू सांगते प्राशन करण्या चहा, चला हो तुम्ही उठुनी ।

द्विज-गण अपुल्या कंठ रवे मज निद्रेतुनि जागे करतो
वाटा चुकलेल्या पथिकांना योग्य वाट तो दाखवितो ।

रवि उदयाच्या मंगल समयी, फिरावयाला जातांना
गात थरारे गति अवरोधित ऐकुनि मुरलीच्या ताना ।

कधी कोकिळा आम्र मंजिरीसी गुज गोष्टी करितात
चिमण्यांचे चे विविध मधुर स्वर कर्ण-पटां वर पडतात ।
(कविता ऐका)

डुबुक डुबुक आवाज येतसे घागरीचा विहिरी वरती
जणू काय घट-पाण्या च्या भेटीने मोदा ये भरती ।

कधी कधी एखादा साधू करी घेवोनि एकतारी
प्रात:काली भजन गावूनि दु: मनाचे दूर करी ।

आगगाडी सुरु होण्या समयी वाफेचा जो ध्वनि निघतो
जणू काय वीराचा बाहू रण-त्वेषाने फुरफुरतो ।

भानु-बिंब मावळले होई वातावरण कसे कुंद
देवळातला मधु घंटा-रव तन मन माझे करी धुंद ।

रातराणिचा गंध दरवळे, माउली कुणी तान्ह्याला,
अंगाई म्हणुनिया निजविते भारुन टाकी स्वर मजला ।

जगात ह्या सर्वत्र कोलाहल पडतो कानी
त्यातलेच मम आवडीचे स्वर निवेदिले हो तुम्हां मी ।

शरद काळे
उज्जैन,१९५०

ऋतुरंग प्रस्तावना


ऋतुरंग प्रस्तावना
ऋतुरंग ह्या डॉक्टर शरद काळे ह्यांच्या काव्य संग्रहाचं हे मल्टिमीडिया सादरी करण आहे. हा काव्य संग्रह पुस्तक स्वरूपांत, कल्पना मुद्रणालय पुणे ह्याच्या तर्फे, 1997 साली मुद्रित होवून 27 डिसेंबर,1998 साली जेष्ठ कवयित्री श्रीमति अनुराधा पोतदार ह्यांच्या हस्ते प्रकाशित झाला. त्या वेळी श्री ना.स. इनामदार, हे ऐतिहासिक संशोधक आणि कादंबरीकार, ज्यांनी ह्या काव्य संग्रहाला प्रस्तावना ही लिहिली आहे, उपस्थित होते. त्यांनी ह्या कार्यक्रमाचं सभापतित्व ही स्वीकारलं होतं . तसेंच प्रसिध्द कवयित्री सौ. हेमा लेले, ह्यांनी ह्या काव्य संग्रहाचं रस ग्रहण केलं .
ह्या मल्टीमीडिया सादरी करणांत ह्या संग्रहातील सर्व कविता आहेत. ह्या संग्रहाचं वर्णन करायचं झालं तर
संग्रहाचया नावांतच ते आहे. जीवनातील विविध रंग दर्शवणा-या ह्या कविता ऋतुरंग ह्या नावाला सार्थ करतात. मराढी माणसाच्या खास अशा सांस्कृतिक चळवळी मधून मातृभाषा जपण्याचा जो प्रयत्न बृहन्महाराष्ट्रीय सतत करीत असतो त्याचेच प्रत्ययीकरण म्हणजे डॉ. शरद काळे ह्यांचा हा काव्य संग्रह आहे .
ह्या संग्रहातील कविता कांही हलक्या फुलक्या असल्या तरी काहीं गंभीर आणि सार-गर्भित आहेत जीवनाचंच नव्हे तर जीवनाच्या शेवटाचं ही दर्शन ह्या कविता घडवितांत. पेशाने डॉक्टर पण मन कविचं. टाटानगर च्या मेडिकल कॉलेजांत प्राध्यापक पण त्यातूनही कविते साठी वेळ काढणारा. “दवडला जन्म
शब्द वेचण्यात रोग निदानार्थ वेळ नाही “अशी प्रांजळ कबूली देणारा शब्दवेडा डॉक्टर .उघड्या डोळ्यांनी कविचा मृत्यु बघत, “आलिया भोगासी सावे सादर “ असे म्हणणारा. निर्जीवांतही सजीवाच्या भावना ओतणारा आगळा वेगळा कवि.
लहानपणा पासून कवितां करायचं अत्यंत वेड अन् त्या कविता बहीण भाऊ आई वडिल ह्यांना ऐकवून त्यांच्या पसंतीचं शिक्का मोर्तब झाल्या खेरीज चैन कसं ते पडायचं नाही. कवितेंत येणा-या उपमा अगदी रोजच्या व्यवहारातल्या पण उपयोग नवीन कि वाटावं अरे हे आपल्याला कां बरं सुचु नये .

पोलकं कवितेतल्या प्रौढ कुमारिकेची व्यथा दर्शविणा-या ह्या ओळी पहा,
“ हिरवी स्वप्ने पहात गपचिप जगतं
एखाद्या दिवशी अचानक बिथरतं
अन् हळदी च्या अतृप्त इच्छेने विरतं.”

किंवा कवि अन् वेदना ह्यांचं कसं अजोड नातं आहे ते दर्शविणा-या ह्या ओळी.
अन् असह्य जवळिक ही
आंत सूर्य कवि अंतर
काष्ठा सम कवि देहा
ज्वलन हेच गत्यंतर

अन् त्या वेदना कशा सोसायच्या तर

विपदांचे जहर जरी
लिहिले असले दैवी
संजीवक ते ठरण्या
मीरेची वृत्ती हवी
अन् ह्याच मीरेच्या वृत्तीनं जीवन अन् मृत्यु दोनही प्रसंगांना सामोरं जातांना जे कांहीं उमटले ते हे ऋतुरंग .