
कधी नदीच्या लाटांचा खळखळाट जो पडतो कानी,
दु:ख विरुनिया जाई सारे मोद प्राप्ती हो ऐकोनी ।
लय गंभीर सागराचा हा कधी मनाला वेधितसे,
भरती आणि ओहोटी समयी फार मनोरम वाटतसे ।
प्रभात काळी कप-बशी अपुला गोड ध्वनी तो ऐकवुनी,
जणू सांगते प्राशन करण्या चहा, चला हो तुम्ही उठुनी ।
द्विज-गण अपुल्या कंठ रवे मज निद्रेतुनि जागे करतो
वाटा चुकलेल्या पथिकांना योग्य वाट तो दाखवितो ।
रवि उदयाच्या मंगल समयी, फिरावयाला जातांना
गात थरारे गति अवरोधित ऐकुनि मुरलीच्या ताना ।
कधी कोकिळा आम्र मंजिरीसी गुज गोष्टी करितात
चिमण्यांचे चे विविध मधुर स्वर कर्ण-पटां वर पडतात ।
(कविता ऐका)
डुबुक डुबुक आवाज येतसे घागरीचा विहिरी वरती
जणू काय घट-पाण्या च्या भेटीने मोदा ये भरती ।
कधी कधी एखादा साधू करी घेवोनि एकतारी
प्रात:काली भजन गावूनि दु: मनाचे दूर करी ।
आगगाडी सुरु होण्या समयी वाफेचा जो ध्वनि निघतो
जणू काय वीराचा बाहू रण-त्वेषाने फुरफुरतो ।
भानु-बिंब मावळले होई वातावरण कसे कुंद
देवळातला मधु घंटा-रव तन मन माझे करी धुंद ।
रातराणिचा गंध दरवळे, माउली कुणी तान्ह्याला,
अंगाई म्हणुनिया निजविते भारुन टाकी स्वर मजला ।
जगात ह्या सर्वत्र कोलाहल पडतो कानी
त्यातलेच मम आवडीचे स्वर निवेदिले हो तुम्हां मी ।
शरद काळे
उज्जैन,१९५०
1 comment:
आहाहाहा...खरंच काही काही आवाज खुप सुमधूर असतात...फ़क्त कान हवेत.
एक आवाज तुम्ही विसरलात इथे कवितेत मांडायला....तुमचा!
आवडली कविता आणि गाणंही...
Post a Comment