Tuesday, November 23, 2010

इच्छा

वाटे वेडे वेडे व्हावे
सोपे सोपे ही चुकावे
वाट सरळ सरळ
तरी त्यात हरवावे

व्हावे विस्तवांत धूर
वर नागमोडी जावे
स्वैर उडत्या पाखरा
घट्ट घट्ट जखडावे

धावे काळवीट धुंद
शाखा शिंगें पर्ण हीन
अशा वेगांत टिकावे
पान होऊन गुमान

एक प्रेमी करकोचा
व्हावा प्रेमभंग त्यांत
चोच सुरीच उरांत
खुपसून व्हावे शांत ।

डॉ. शरद काळे
टाटानगर,१९६६

Sunday, August 22, 2010

नंदीची तक्रार

नंदीची तक्रार
मंदिरातला दगडी नंदी
समोरच्या कैलास पतीला लवून वंदी ।
उणीव अपुली त्यास निवेदी
शल्य शिवा हे निशिदिनि बघ मम मानस भेदी ।
तुझ्या पुढे हा पडा पहारा
देउनि झाले अंतरंग मम गर्म सहारा ।
खंगे मानस उंट बिचारा
हवाच हिरवा हिरवा त्याला कोमल चारा ।
सखये ची मम याद येतसे
नकळे अंतरी हंबरून ती साद देतसे ।
जवळ जावया ओढ घेतसे
शरीर माझे तसे लोहकण चुंबकी जसे ।
तुज जन भोळा सांब बोलती
ओळखतो मी तुला चंट आहेस तू अती ।
कधी कधी हिमशैलजा सती
विचार वेषा ने बहकविते तुझी ही मती ।
त्या वेळे करिता मांडविली
मानवा कडुन तूच उमेची प्रतिमा इथली ।
आणि लबाडा शिवरात्रीला
तुझ्या उमे सम होती किति तरी युवती गोळा
शिवा असा सण कर ना काही
जया समयाला जमतिल येते सुंदर गाई
किंवा आदेशून ह्या नरा
उभव धेनुची शिल्पाक़ति तरी इथे सुरवरा ।
शरद काळे
ग्वाल्हेर, 1962

Friday, February 12, 2010

पोलकं

एक आहे पोलकं दिसायला ढोलकं
पोरपणी होतं म्हणे फार फार बोलकं
आता तर हालतात नुसतीच लोलकं
जेंव्ह पासुन आड चोळी आली द्वाड
पोलक्याचं गेलंय मागे कवाड
कुणी येत नाही, दार ढकलीत नाही
वरच्या पेक्षा पोलक्याला खाली ताण राही
ऑफिसांत जातं घामाघूम होतं
फार झालं म्हणजे रुमाल आंत घेतं .
वर्षानुवर्ष तोच तोच स्पर्श
वाढत्या मेदाशी वाढता संघर्ष
हिरवी स्वप्ने पहात गपचिप जगतं
एखाद्या दिवशी अचानक बिथरतं
अन् हळदी च्या अतृप्त इच्छेने विरतं .

शरद काळे
ग्वाल्हेर, 1964

Saturday, January 23, 2010

कॉलेज क्वीन

ही कविता डॉ. काळे जेंव्हा शिकत होते त्या वेळची. तेंव्हां कॉलेज क्वीन ही सुंदर मुलींना दिली जाणारी एक उपाधी असायची . वर्णन जरी आजकाल च्या मुलींशी जुळणारं नसलं तरी भाव तोच . बघा तरी त्या वेळ ची ही कॉलेज क्वीन.
उडवी फरारा अवळ वारा पदर विरळ वॉइल चा
सुवास भारी भरी खुमारी कामिनिया ऑइल चा ।
वेण्या नच त्या काळ्या सरिता कृष्ण पर्वता मधुनि
उगम पावती, त्वरित धावती, रिबिना जाती मिळुनी ।
मोहक लाली गालां वरली लाजविते लज्जेला
गौर वर्ण होई विवर्ण पाहून गौर अंगाला ।
हे नेसर्गिक वरुन साहजिक मेकप कां न खुलावा
नव युवकांचा मेंदू वरचा ताबा कां न सुटावा ।
किरण रवीचे कसे नेमके शिरती ब्लाउज माजी
अन् क्रोधाने पेन ही चमके दाकविण्या नाराजी ।
करी बुकें अन् उरी धुके सोन्या चे कैसे दाटे
स्वत: पुढे सौंदर्य फिके जगताचे तिजला वाटे ।
ही अभिमानी सिंह गामिनी मज कां पुसता कोण
रूप आणि आवेश दर्शवी ही तर कॉलेज क्वीन ।
तिला द्यावया काया माया उत्सुक किति तरी असती
धनिकांचे रंगेल छोकरे नित निज अंतरी झुरती ।
आणि भाबडे नर ते वेडे दुसरे अगणित असती
हृदय आपुले, प्रेम उदेले, अर्पाया तिज जाती ।
पदांवरी जे स्थिरे, शिरी त्या, लाथाडुन ती राणी
वदे योग्य परि कोणि नसे, नर कुठे कुठे इंद्राणी ।
प्रणय भंग विसरण्या भांग पानांत दंग कुणि झाले
परि दुभंगले अंतरंग ज्यांचे ते स्वर्गी गेले ।
असा किति तरी युवकांचा तिज पाई झाला नाश
योग्य परी तिज कोणि मिळेना घालाया कर पाश ।
दिन वर्षाचे मणी सरकले, वर्ष मालिका फिरली
लग्नाविण परि कॉलेजा ची राणी अंतरी झुरली ।
त्या राणीच्या दासी बटकी ही झाल्या संसारी
नावाची परि राणी असुनी राही तीच कुमारी ।
ज्या दगडी कॉलेजाची ती झाली होती राणी
त्याने ही काढली तिला प्रभु अगाध रे तव करणी ।
अखेरीस मग त्या राणीवर यौवन नृप ही रुसला
अलंकार एक एक काढी ती त्यानेच दिलेला ।
अन् मग एके दिवशी केला कहरच त्या राणीने
कुरूप काळ्या प्रौढ वराला वरले आनंदाने ।
शरद काळे
ग्वाल्हेर 1957

Saturday, January 9, 2010

ओळखा पाहू

शालु तपकिरि तनु लतिके वरी खुलुनी ऐसा दिसे
बघुनि मन ही वेडे पिसे ।
लचकदार नाजूक कटिवर कटिपट्टा निळसर
खुणवि मज वेड्या पुढती सर ।
लांब निमुळते पाय तियेला हजार असती पहा
हळुच कुरवाळी मी त्यां अहा ।
विळखा घालुनि कटी भोवती तिच्या पिरे मी पथी
न मज वाटे लोकांची क्षिति ।
धुंदीत तिच्या सहवासाच्या मी असे
चालता पथीं जन खाकरती हो कसे
पाहुनि अम्हां ते नाक मुरडिति पिसे
त्रास तयांचा असा चुकविण्या फटफटते तो वरी
असू आम्ही हो मार्गा वरी ।

रहदारी सुरु होण्या पूर्वी अपुल्या परि हो त्वरा
करोनी येतो आम्ही घरा ।
तरि एखादा लाल हरीचा रामप्रहरी परी
पकडितो आम्हा रस्ते वरी ।
प्रणय क्रीडा बघुनि आमुची मिटुनी तो लोचन
पुटपुटे नरक नसे याहुन
उचलिना पापण्या डोळ्यांच्या तो वरी
जाहलो दिसेनासे आम्ही जोवरी
उघडून नेत्रद्वय वदे असा नंतरी
मार्ग अता हा पवित्र सुंदर स्वच्छ मला वाटतो
बघुनि मनि मोद कसा साठतो ।

काव्य रसिक परि लोक तुम्हा मी निवेदिली जी कथा
ऐकण्या फक्त नसे ती वृथा ।
विचार करुनि नीट तरी धावत या सांगण्या
कोण ही आहे माझी प्रिया ।
पाणि पालथ्या घागरि वरती उगिच ओतले फुका
असे मज वाटू देऊ नका ।