Tuesday, December 15, 2009

थंडी

दाट धुक्याची कुल्फी मलई
पृथ्वीच्या पेल्यात ओतुनी
चघळित बसले विक्षिप्तच नभ
चंद्र किरण चमच्याने ढवळुनि ।
बळे बळे पोत्यांत कोंबला
रात्रीचा जो घन कोलाहल
गस्त शिट्या अन् गजर घड्याळी
त्यांत आणती क्षणिक चल बिचल ।
सायकलींचे धूड धडधडे
थडथडतात दुधाच्या टंक्या
त्या वर तोल सावरित भैये
घेती गर्म विडीचा झुरका ।
दुलईतील चाळवा चाळव
उठा उठा च्या अस्फुट हाका
शिळ्या कढी ला ऊत येउनी
सैल मिठ्या दृढ करती काखा ।
ताठ पुलाच्या वक्र कमानी
लक्तरेंच खाली अवघडली
नर देही कां आंत हुडहुडी
वा थंडीच निवा-या पडली ।
आंत उबेने छान लाडवुन
उष्ण उष्ण फुरफुरती किटल्या
आणि उबेस्तव अशाच केवळ
बशा कपांवर व्यर्थ टेकल्या ।
उजाडले जाणवून भास्कर
धैर्य जरा उठण्याचे करितो
थंडी चे परि बघुनि तांडव
पुन्हा अभ्रि गुरफटून घेतो ।
खुद्द चहाला असह्य थंडी
थंड कपाची सोडुन सोबत
लोळत लोळत उदरी अलगद
ऊन ऊन ते करितो खलबत ।
कृत्रिम गर्भपात अंड्यांचा
कुणी करी सर्रास तव्या वर
बाटलीतली सलज्ज मदिरा
नयनी होतसे आज अनावर ।
अस्सल दडवुनि ओव्हर कोटी
दुबळे दिसती प्रसन्न दणगट
चेस्टर वेढुनि उदास प्रमदा
कुणिही न दाखवू शके अंगलट ।
गजबजे न गजबजे तोच दिन
कसा संपला कुणा न कळले
आणि पुन्हा त्या हिम गौरीचे
आसमंती साम्राज्य पसरले ।