Thursday, October 2, 2008

आमुचे आजोबा


असे आमुचे आजोबा, असे आमुचे आजोबा
दमा, खोकला, काठी यांची संगत अजून नाही बा । असे आमुचे आजोबा

डोई वर भोवती चांदणे मधे विलसतो चांदोबा
चांदोबाला गिळतो काळा टोपीचा तो बागुलबा । असे आमुचे आजोबा
(कविता ऐका)

हिरवे हिरवे पिंगट डोळे, बघुनि आठवे वाघोबा
चेहेरा सूर्य जणू लखलखता सरळ न बघवे कोणा बा । असे आमुचे आजोबा

खड्या सुराने करिती पूजा गप्प ऐकतो खंडोबा
नैवेद्याची साखर नंतर देती करून खोळंबा । असे आमुचे आजोबा

वयास झाली ऐंशी वर्षे अजुनि आवडे मोरंबा
अचडं बचडं त्यांचं ऐकुनि मुखी हसूचा खुले डबा । असे आमुचे आजोबा

वाघा परि दरडावुन म्हणती असा बोलतो कोल्होबा
म्हणती शुभीला लाडोबा पण मला मात्र कां दांडोबा । असे आमुचे आजोबा

उघड्या अंगी टोपी घालुनि कुठे निघाले आजोबा
वेडा का तू, अनेक कामें म्हणून घाईत आजोबा । असे आमुचे आजोबा

चुके पईचा हिशेब, बेरिज करित काढती जन्म उभा
शाळा अन् मंडई, मंडळी ह्यात गुंगती आजोबा । असे आमुचे आजोबा

अमुचे अपुले पोट चिमुकले, पोट तयांचे पोटोबा
खाण्या पेक्षा स्वत: करुन घालण्यात रमती आजोबा । असे आमुचे आजोबा

अधिका-याचा मान मास्तर पण हाडाचे आजोबा
प्रेमाने शिकविती, छे¡ हाडे कुंबलती आजोबा । असे आमुचे आजोबा

त्यांच्या पुढती आमही वाकता, अश्रु रेटती आजोबा
त्यांचे गुडघे दुखणे लवकर थांबव ना रे हेरंबा । असे आमुचे आजोबा

शरद काळे
टाटानगर
१९७४

2 comments:

संदीप सुरळे said...

Sunder kavitaa...god kavitaa...:)

Aruna Kapoor said...

कविता खूपच छान आहे।... आजोबांची आठवण झाली।