Tuesday, October 21, 2008

दीपावली

हे दिवे उजळले बघा किती
जणु नयन दिवाळी चे हसती ।
(कविता ऐका)

दीपावलि चे महत्व तैसे
नाताळाचे असते जैसे
म्हणुनि या सणाला साजेसे
स्वागत सगळे जन करताती ।।

शरद ऋतुच्या शुभ आगमनी
दीपावली ही येते सदनी
मुले मुली खोळतात मिळुनि
टिप-या झिम्मा दांडु-विटी ।।

प्रथम दिनी असते धन तेरस
तेवतात हे दीप मधु-सरस
ज्योत तयांची दक्षिण बाजुस
जणु यमराजां आरती करिती ।।

चतुर्दशी नरकाची नंतर
वधिला देवाने नरकासुर
चला विनाशु दुर्गुण सत्वर
तम नाशुनि उजळू ही धरती ।।

तिसरे दिवशी श्री चे पूजन
धन संपत्तिस पूजितात जन
मुले उडविती आनंदानं
फटाके नळे चंद्र-ज्योति ।।

बाल बालिका सगळे जमती
पक्वान्नाचा फन्ना करिती
नवे नवे हे खेळ खेळिती
दिपवाळीच्या नाना गमती ।।

भाउबिजेची मौज वेगळी
नटुनि थटुनि ताई ओवाळी
दादा मग ओवाळणि घाली
पाहुनि तया हसते मग ती ।।

रम्य दिवस हे दीपावलिचे
सुखविति मन जे सर्व जनांचे
माझ्या मनि कविता लिहिण्याचे
विचार म्हणुनि उद्भवती
शरद काळे
उज्जैन,१९५०

1 comment:

संदीप सुरळे said...

भाउबिजेची मौज वेगळी
नटुनि थटुनि ताई ओवाळी
दादा मग ओवाळणि घाली
पाहुनि तया हसते मग ती

Khupach god aahe yaa oli :)
Kavitaa chaan aahe...agadi divaalich janu kaahi :)

Dipaavalichyaa hardik shubhechaa aapalyaalaa aani aapalyaa comp. engineerenaa :)